श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नमः || श्री सद्गुरुभ्यो नमः ||
गुरूर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः | गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः |
कुठल्याही शुभकार्याचा शुभारंभ होतो तो श्री गणेश , श्री सरस्वती आणि श्रीसद्गुरूला मनोभावे वंदन करूनच… हे सद्गुरू साईनाथ, तू चाराचाराचा विसावा आहेस… तू या अवघ्या विश्वाचं अनिष्ठान आहेस… सर्व दैवदैवत, कुलपुरुष आणि तुझ्या चरणी लीन होऊन त्रिवार वंदन करून मी लेखणी हातात सगळं यथोचित घडवून आणशील ही प्रार्थना. कार्य सिद्धीस नेण्यास तू समर्थ आहेस. श्रावण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, हास्य, सख्य व आत्मनिवेदन अशी नवविधा भक्ती प्रसिद्ध आहे. ही मुख्य लक्षणे आहेत भक्तीची… अनेक साईभक्त आहेत ह्या भक्तीच्या रसायनाने ओथंबलेले… त्यातीलच एक श्री.अरविंद म्हैसकर हे बिल्डर ,
साई, साई, साईबाबा दैवत माझे |
भक्तीची गाज माझ्या मनांत वाजे ||
हे अरविंद म्हैसकर साईनाथांना आपले दैवत समजतात. यांच्या मनात साईभक्तीची गाज नेहमीच खळखळत असते. भक्तीपोटी.. श्राद्धेपोटीच त्यांनी महाराष्ट्रातील..ठाणे जिल्हा.. वसई तालुक्यात त्रिभुवन संगमावर म्हणजेच दिवाणमान, नवघर,माणिकपूर या गावच्या हद्दीवर एक साईमंदिर स्थापन केले. तेथे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती प्रस्थापित केली. … साईनाथाच्या मंदिरात भक्त श्रद्धेने येत. पूजाअर्चा करीत… पण त्या मंदिराला दरवाजा नव्हता. त्यामुळे गुरे-ढोरे गाभार्यापर्यंत थेट प्रवेश करीत आणि नुसता प्रसादच नाही तर देवावर वाहिलेले फुलेसुद्धा फस्त करीत. अर्थात त्यात त्या मुक्या प्राण्यांचा काहीच दोष नव्हता.खाण्याची वास्तू खाणारच… त्यांचं फळाफुलांवर… प्रसादावर यथेच्छ ताव मारणं चालूच होतं. त्या जनावरांचा धुमाकूळ वाढतच चालला होता….. अन एके दिवशी साईबाबांच्या मूर्तीचा आशीर्वाद देणारा हातच निखळलेला आढळला. सगळेच भक्त चिंतातुर झाले. त्यांनी तो हात कसाबसा फेविकॉलने चिकटविला. हात चिकटविल्यानंतर साईभक्त थोडासा श्वास घेत नाहीतर एके दिवशी मूर्तीची मानच वेगळी झालेली दिसली. आणि मग मात्र भक्तांच्या चिंतेला पारावर राहिला नाही. काय करावे ? काय करावे ? ह्याचा उहापोह चालू झाला. सर्व शिवसैनिक एकत्र आले. प.पूज्य दयानंदबाबांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व परमसाईभक्त श्री. संदेश जाधव यांच्या पुढाकाराने २६ जानेवारी १९८७ रोजी ‘शिवछाया’ मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली.
काय बाबांचे चमत्कार | किती वर्णू मी पामर |
देवा-देऊळांचेही जीर्णोद्धार |
बाबांनी अपार करविले ||
बाबांची काया मानवाची होती, तरी करणी मात्र देवाची होती.हेमाडपंत म्हणतात… मी पामर किती म्हणून वर्णन करू ? असंख्य देवळांचे उद्धार बाबांनी केले. त्यांनी शिर्डीला तात्या पाटलांच्या हस्ते शनी, गणपती, शंकर.. पार्वती.. ग्रामदेव आणि मारुती यांच्या देवळांची नीट व्यवस्था लावून घेतली. बाबांच्या ह्या करणीचा समान धागा अनुसरूनच प. पूज्य दयानंदबाबांच्या मार्गदर्शनाखाली.. श्री. संदेश जाधव ह्यांच्या पुढाकाराने साईमंदिराच्या जीर्णोद्धाराचा घाट आरंभिला गेला.सगळ्याच कार्यकर्त्यांनी निश्चय केला कि, मंदिराचा जीर्णोद्धार करायचाच.. अन ‘शुभस्य शीघ्रम’… सामानाची जमवाजमव चालू झाली. श्री. व्ही. व्ही. थॉमस ह्यांनी लोखंड.. नेमिनाथ ह्यांनी सिमेंट.. श्री. मंगल प्रभात लोढा ह्यांनी साईबाबांची संगमरवरी मूर्ती दिली. अन साथी हाथ बढाना साथी रे.. या उत्कीप्रमाणे सगळ्यांच्या मदतीने.. अथक प्रयत्नाने.. साईबाबांचे मंदिर आकारास आले. सगळ्यांच्याच उत्साहाला भरते आले होते. आखीव, रेखीव, सुंदर मंदिर बघून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले होते. गुरुवार २१ जानेवारी १९८८ ला संध्याकाळी ७.३ वाजता नवयुग नगरपासून साईमुर्तीची भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मिरवणुकीला साईभक्तांचा सागरच लोटला होता. अन बघता बघता तो मंगल पवित्र दिवस उजडला. साई भक्तांची आतुरता, उत्सुकता परमसीमेला पोहोचली होती. अन माघ शुद्ध षष्ठी ४ शके १९०९.. शुक्रवार दिनांक २२ जानेवारी १९८८ ला.. शुभप्रभाती ७.३० च्या मंगल घटिकेला प.पू. दयानंदबाबांच्या आशीर्वादाने आणि मा. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर श्री. आनंद दिघे साहेब यांच्या करकमलाद्वारे साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. साईच्या गजरात सगळं आसमंत दुमदुमून गेला. सारा परिसर.. आनंदाने.. पवित्र्याने भारावलेला.. साईभक्तांची असीम श्रद्धा.. उत्कट प्रेम ह्याचे मनोज्ञ दर्शन तेथे दृष्टीस पडले. मंत्रोपचारासाठी बोळींज येथील जोशी गुरुजी व त्यांचे बंधू उपस्थित होते. साईबाबांची कृपा.. भक्तांची आस्था आणि साईप्रती भक्ती ह्यामुळेच हे पवित्र कार्य संपन्न झाले. ह्याच दिवशी सकाळच्या सत्रात ९ – ३० वाजता मा. आनंदजी दिघे यांचे हस्ते श्री साईबाबा मार्गाचा नामकरण समारंभ, मंडळातर्फे विकसित जि. प. शाळा माणिकपूरचे नूतनीकरण, मी. फुलेंचे स्मारक व स्व. अशोक उद्यान उदघाटन सकाळी ११ – ३० वाजता व श्री सत्यनारायणाची महापूजा सुसंपन्न झाली. सायंकाळी ७ – ३० वाजता दत्तप्रसाद भजनी मंडळातर्फे.. अतिशय सुरेल असा भजनाचा.. कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे भक्तीरसाचा परिमळ चोहीकडे दरवळला आणि रात्री ‘शिर्डी के साईबाबा’ हा साईबाबांचा महिमा दाखवणारा चित्रपट दाखविण्यांत आला. ह्या चित्रपटामुळे साईबाबांची भक्ती व्दिगुणीत झाल्याचं भक्तांना जाणवलं. हा चित्रपट प्रत्येक साईभक्ताच्या मनांत घर करून राहिला.
…अशा प्रकारे प. पूज्य दयानंद बाबांच्या आशीर्वादाने, मान्यवरांच्या आणि साईभक्तांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तर झालीच. पण.. सामाजिक जाणीवेची ज्योतही, प्रज्वलित झाली आणि सामाजिक बांधिलकीही साईभक्तांनी आत्मीयतेने जपण्यास सुरुवात केली.
|| इति श्री साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना संपन्न |